शनिवार, २३ मे, २००९

जिवनात यशस्वी कसे व्हाल?


एखादं क्षेत्र निवडताना ते मनापासून आवडतं आहे का, याबरोबर आपली त्या क्षेत्रात उत्तमोत्तम काम करण्याची किती तयारी आहे, हाही विचार करणं गरजेचं असतं. “उत्तमाच्या आराधने’ने आपण जग जिंकू शकतो.योगशास्त्राने अंतःकरणाची त्याच्या कार्यानुसार चार भागांत विभागणी केली आहे. एक आहे चित्त, जे पंचेद्रियांद्वारे जगाचा अनुभव घेते आणि स्मृतीमध्ये साठवून ठेवते. दुसरा भाग आहे, अहंकार, जो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे आणि आपल्या आवडीनिवडीतून तो व्यक्त होत असतो. वस्तू आणि घटना यांचे सत्य स्वरूप जाणण्याची आणि ते ज्ञान साठवून ठेवण्याची कामगिरी बुद्धिमत्ता करते, तर चौथा भाग मन हे भविष्याचा वेध घेऊन पुढील घटना चांगल्या वा वाईट असतील याचा ठोकताळा बांधण्याचा प्रयत्न करते. रोजच्या व्यवहारात या चारही अंतःकरणांचा उल्लेख मन असाच केला जातो. याखेरीज आणखी एक विशेष देणगी मानवजातीला मिळाली आहे आणि ती म्हणजे वाणी किंवा बोलण्याची क्षमता. मन अंतःकरणाच्या इतर तीन भागांसह जगाचा अनुभव घेते आणि वाणी त्या अनुभवाला शब्दरूप देते. अशा तऱ्हेने आपण कोणतीही गोष्ट शिकतो; एक तर स्वानुभवातून किंवा इतरांनी घेतलेल्या अनुभवांचे वर्णन ऐकून.विवेकबुद्धी महत्त्वाचीमाणसाकडे आणखी एक शक्ती आहे आणि ती म्हणजे त्याचे अंतर्मन किंवा विवेकबुद्धी. ही सर्वसाक्षी परमेश्‍वराच्या किंवा आत्म्याच्या फार निकट असते. अंतःकरणाच्या आणि वाणीच्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम ही शक्ती करते. एकाग्रता साधण्याची शक्ती जशी मनात आहे तशीच कोठेही एकाग्र न होता प्रत्येक क्षणाला अनेक अवधाने सांभाळण्याची सुद्धा शक्ती मनात आहे. जेव्हा मन एखाद्या गोष्टीवर एकाग्र होते तेव्हा अंतःकरणाच्या सर्व शक्‍तीसुद्धा त्याच वस्तू अथवा घटनेवर लक्ष केंद्रित करतात आणि मनात शब्दरूपाने येणारे विचार वाणी व्यक्त करते. लक्ष केंद्रित करणे आणि न करणे या दोन्ही शक्ती रोजच्या व्यवहारात आवश्‍यकच आहेत. जेव्हा एकाग्रता असते तेव्हा अंतर्मन हे अंतःकरणाला नियंत्रित करीत असते पण अशा तऱ्हेने नियंत्रण ठेवलेले अंतःकरणाला आवडत नाही. त्यामुळे ते सवयी लावते. या सवयी आपले विचार, भावना आणि प्रतिसाद नियंत्रित करीत असतात. एकदा सवयी लागल्या की जे घडतंय त्याकडेअंतःकरणाला लक्ष द्यावे लागत नाही आणि ते मग मुक्तपणे इकडे तिकडे भटकू शकते.काही सवयी आपल्या उद्दिष्टाकडील वाटचालीत आपल्याला मदत करतात. अशा सवयी जास्त असतील तर तुम्हाला नशीबवानच म्हणावे लागेल पण अनेक वेळा, सवयी तुम्हाला तुमच्या ध्येयमार्गावरून विचलित करणाऱ्या, दूर नेणाऱ्या असतात. अयोग्य सवयी शोधून त्या सोडण्यासाठी आणि योग्य मार्गावर ठेवणाऱ्या सवयी जोपासण्यासाठी योगामधील साधनांचा उपयोग होतो. अंतःकरणाच्या सर्व शक्तींना शिस्त लावून एकाग्रता न साधल्यास आयुष्य कोणत्याही नियंत्रणाशिवाय वाऱ्यावर भरकटणाऱ्या बोटीसारखे हेलकावे खाऊ लागते आणि पर्यायाने दुःख व अपयश हाती येते.
अंतःकरणाच्या शक्तींना शिस्त लावण्याचा आणि आयुष्याची सूत्रं आपल्या ताब्यात घेण्याच्या पद्धती योगशास्त्रात आपल्याला शिकायला मिळतात. अन्यथा सरदारांनी आणि मंत्र्यांनी ज्याची सत्ता बळकावली आहे अशा दुबळ्या सम्राटासारखी आपली अवस्था होते. सम्राटाला न जुमानणारे हे मंत्री अखेर त्या सम्राटाला तुरुंगात टाकून सत्तेवर कब्जा मिळवतात खरा; पण राज्य करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसल्याने हाती दुःखच येते.
तीव्र इच्छा हवी!पहिले काम म्हणजे तुम्ही जे काही करता ते करण्यामागचे खरे कारण शोधा. मी हे का करीत आहे, असा प्रश्‍न तुम्ही स्वतःलाच विचारा आणि जे उत्तर मिळेल त्यातून त्याची निवड करण्याची कारणे तुम्हाला मिळतील. एखादे विशिष्ट क्षेत्र किंवा विशिष्ट खेळ निवडण्यामागे त्याची मनःपूर्वक आवड किंवा मनात खोलवर कुठेतरी तीव्र इच्छा असते. जर ही उत्कट इच्छा ओळखता आली, अधिक दृढ करता आली तर त्या ध्येयाच्या दिशेने जाण्याची बांधिलकी निर्माण होऊ लागते. तुम्ही जे करता त्यावर तुमचे प्रेम असेल तर ते काम तुम्ही उत्तम तऱ्हेने करू लागता आणि मग यशाच्या शक्‍यता वाढतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्ही फक्त तुमच्या आवडीचे क्षेत्रच निवडू शकता, त्यातील आव्हाने नाही! आव्हाने तुमच्या अंगावर अचानक येऊन पडतात आणि ती जशी येतात, तशी तुम्हाला स्वीकारावी लागतात. काही वेळा तुम्हाला तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचीही संधी मिळत नाही. अशावेळी चिडचिड किंवा खंत करीत बसलात तर त्याचा परिणाम कामगिरीवर होऊन यश नक्की हुलकावणी देते.ज्याप्रमाणे स्वतः निवडलेली व तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट तुम्ही उत्तम करू शकता त्याचप्रमाणे आव्हान स्वीकारण्याची भावनाही तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत नेऊ शकते. प्रत्येक खेळाडूला त्याचा खेळ खेळायला आवडते पण त्यातील कौशल्ये मिळवण्यासाठी लागणारे कष्ट घ्यायला मात्र तो फारसा राजी नसतो.
उत्तमावर लक्ष हवंअंतःप्रेरणा आणि आव्हाने शोधून त्यांच्याशी असलेली बांधिलकी दृढ करणे ही खेळाडूंच्या कारकिर्दीमध्ये चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. याविषयी एकदा खात्री करून घेतली नाही तर कष्ट झेलण्याची इच्छाच नाहीशी होते. त्याग आणि मोहांपासून दूर राहणे जमेनासे होते. त्यामुळे स्टॅमिना, कौशल्य आणि सामर्थ्य कमावण्यासाठी लागणारी शिस्तही पाळणे जमत नाही आणि मग जिंकण्याच्या सर्व शक्‍यता मावळू लागतात.परस्परावलंबी अशा दोन सवयी कोणत्याही परिस्थितीत मोडल्या पाहिजेत. आपली स्मृती अशी युक्ती करीत असते, की त्यामुळे ज्याचा विसर पडायला हवा तेच सतत आठवत राहते. भूतकाळातील चुका आणि अपयश याचे स्मरण इतक्‍या वेळा केले जाते, की ते अक्षरशः स्मृतीत कोरले जाते. मग हळूहळू ते आपल्या व्यवस्थेत झिरपते आणि मग त्याच चुकांची पुनरावृत्ती सातत्याने होऊ लागते. यातून दुसरी सवय जडते अन्‌ ती म्हणजे भविष्यकाळाची भीती वाटू लागते.
भूतकाळातील चुकांमुळे क्षुब्ध होणे आणि चुकांबद्दल धुसफुसत राहणे आणि भविष्याची काळजी करणे या दोन घातक सवयी अंतिमतः दुःखाकडे नेतात. या अयोग्य सवयींपासून सुटका करून घेण्यासाठी उत्तमावर लक्ष एकाग्र करायचे आणि ते जेव्हा व्यक्त होईल तेव्हा त्याचा सन्मान, सत्कार करायचा. ही सवय जडली की प्रतिस्पर्ध्याच्या नैपुण्याची भीती वाटेनाशी होते कारण प्रतिस्पर्ध्यातील उत्तमाचा सत्कार तुमच्यामधील सर्वोत्तम व्यक्त होण्यासाठी प्रेरणादायी ठरतो. प्रतिस्पर्धी खेळाडू जेव्हा त्याचा सर्वोत्तम खेळ खेळत असतो तेव्हा त्याच्यापेक्षा अधिक कौशल्य तुम्ही दाखवू शकला तरच तुम्ही विजयी होऊ शकता. तुम्ही जिंकावे म्हणून प्रतिस्पर्धी खेळाडूने खराब खेळ करावा अशी आशा केल्यास, तुमचे जिंकण्याचे मनसुबे धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत!
गुणवत्तेला बांधिलकीची जोड हवी!गुणवत्ता हेरून त्याला प्रोत्साहन देण्याबाबत खूप बोलले जाते. पण थोडे प्राथमिक यश वगळता केवळ गुणवत्ता उपयोगी ठरत नाही हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. एकदा खेळाडू वरच्या श्रेणीत जाऊ लागला, की त्याला अपयश येऊ लागते आणि ते स्वीकारणे पार जड जाते. गुणवत्तेला जोड हवी ती संपूर्ण बांधिलकीची आणि ध्येयाप्रती समर्पणाची; विजयासाठी आवश्‍यक अशी कौशल्ये यामुळे जोपासता येतात. या गुणांच्या अभावामुळे अनेक हुशार व्यक्तींच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला आहे असे आढळून येते. याउलट, फार थोडी हुशारी असलेले, पण सर्वोत्तमाचा ध्यास घेतल्याने सर्वोच्चपदी पोचलेले व तेथे बराच काळ टिकलेले अनेक जण आढळतात. बुद्धिमत्ता ही दैवी देणगी आहे पण ती देणगी मिळाली नाही तर काळजी करण्याचे कारण नाही. बांधिलकी आणि समर्पण हे अधिक खात्रीपूर्वक तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेतील. दृढ संकल्प केल्यास कोणतेही कौशल्य अथवा ध्येयसिद्धी अशक्‍य नाही.
भविष्याचा विचार करताना स्थैर्याची चिंता तुम्हाला सतावत असते. प्रत्येकाला लवकरात लवकर आश्‍वस्त करणारा आणि स्थैर्य देणाराभविष्यकाळ हवा असतो. यासाठी समर्पण आणि दृढ संकल्प या साधना उपयोगी पडतात. योगशास्त्र असे सांगते की जर तुम्ही सर्वोत्तमाची आराधना केलीत, त्यावर लक्ष एकाग्र केले तर ते तुमच्यात बिंबवले जाते आणि मग तुम्हाला रोजीरोटीची चिंता करावी लागत नाही. कारण समृद्धी ही उत्तमाच्या मागोमाग येतेच.बांधिलकी, समर्पण आणि कष्ट या साऱ्यांना पर्याय नाहीत, याची सवय जोपासल्यास तुम्ही केवळ अजिंक्‍यच नाही तर समृद्धही व्हाल। !! आन्नासहेब चौधरी !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा